जयपूरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने बुधवारी क्रिकेटपटू यश दयाल यांचा जामीन अर्ज फेटाळला. दयालवर एका अल्पवयीन मुलीसोबत कथित लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत.
POSCO न्यायालय: जयपूरच्या एका विशेष पॉक्सो न्यायालयाने बुधवारी क्रिकेटपटू यश दयाल यांच्या अल्पवयीन मुलीसोबत कथित बलात्कार प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे प्रकरण अल्पवयीन पीडितेशी संबंधित गंभीर आरोपांचे आहे आणि या टप्प्यावर आरोपीला जामीन देणे योग्य नाही. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर यश दयाल यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाचा निर्णय
विशेष पॉक्सो न्यायालय क्रमांक ३ च्या न्यायाधीश अलका बंसल यांनी आदेशात म्हटले आहे की, पीडितेचे म्हणणे, उपलब्ध पुरावे आणि प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेता, या वेळी जामीन देणे योग्य नाही. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, अल्पवयीन व्यक्तींशी संबंधित प्रकरणांमध्ये अत्यंत सावधगिरी आणि संवेदनशीलता बाळगणे अनिवार्य आहे.
आदेशात हे स्पष्ट करण्यात आले आहे की, आरोपीला कधीही अटक होऊ शकते आणि तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी संरक्षण दिले जाऊ शकत नाही.
खटला सांगानेर सदरमध्ये दाखल
सांगानेर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने आरोप केला आहे की, यश दयालने तिला क्रिकेट करिअर बनविण्यात मदत करण्याचे वचन देऊन दीर्घकाळ लैंगिक शोषण केले. पीडितेने सांगितले की, दयालने स्वतःला प्रभावशाली क्रिकेटपटू म्हणून सादर केले आणि भावनिकदृष्ट्या प्रभावित करून भविष्यात सहकार्य आणि संधी देण्याचे आश्वासन दिले.
तक्रारीत असाही आरोप आहे की, पीडितेने नंतर दयालला जाब विचारला असता तिला धमक्या देण्यात आल्या आणि संपर्क तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पीडितेने पोलिसांशी संपर्क साधून औपचारिक तक्रार दाखल केली.

दयाल यांचे म्हणणे
सुनावणीदरम्यान, यश दयाल यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की आरोप खोटे आहेत आणि ते परस्पर संमतीवर आधारित आहेत. बचाव पक्षाने सांगितले की, दयाल एक प्रतिष्ठित व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत आणि ते तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) ने यश दयालला आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी संघात ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. दयाल दोन गंभीर फौजदारी प्रकरणांचा सामना करत आहेत, त्यापैकी एक POCSO (मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा) अंतर्गत नोंदवलेले आहे, त्यामुळे फ्रँचायझीच्या या भूमिकेवर अनेकजण प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
दयालने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर कोणतीही स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही. या अंतिम सामन्यात RCB ने पंजाब किंग्जला हरवून आपले पहिले लीग विजेतेपद पटकावले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना यूपी टी२० लीग मधून निलंबित केले होते.









