माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता? संजय राऊतांनी अमित शहांना पत्र लिहून मागितली माहिती

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ठिकाणाबद्दल संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. अमित शहांना पत्र लिहून त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची माहिती मागितली.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे ठिकाण अज्ञात; संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून त्यांची सुरक्षा आणि आरोग्याची माहिती मागितली, विरोधकही चिंतेत.

EX VP Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणाबद्दल आणि आरोग्याबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धनखड यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याचे विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे.

कपिल सिब्बल यांच्यानंतर आता संजय राऊतांचा सवाल

काँग्रेसमधून बाहेर पडून राज्यसभेत असलेले ज्येष्ठ वकील आणि नेते कपिल सिब्बल यांनी यापूर्वीच या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही हाच मुद्दा उचलून धरत गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात धनखड यांचा सध्याचा पत्ता, आरोग्य आणि सुरक्षेची माहिती देण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हणाले राऊत?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता? संजय राऊतांनी अमित शहांना पत्र लिहून मागितली माहिती

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "माजी उपराष्ट्रपतींबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यांचा सध्याचा पत्ता आणि आरोग्याची स्थिती अज्ञात आहे. राज्यसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले."

राऊत यांनी असेही म्हटले आहे की, दिल्लीत अनेक अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नाहीत. त्यांचा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही.

अफवा आणि चिंतेचे वातावरण

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात धनखड यांची तब्येत ठीक नसल्याची चर्चा सुरू आहे. राऊत म्हणाले की, ही परिस्थिती गंभीर चिंतेची बाब आहे आणि देशाला याबद्दल योग्य माहिती मिळायला हवी. त्यांनी सवाल केला की, "आमचे माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का?"

गेल्या आठवड्यात शिवसेना (उद्धव गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, "आमचे माजी उपराष्ट्रपती आता कुठे आहेत? हा मुद्दा गंभीर आहे आणि यावर चर्चा व्हायला हवी."

Leave a comment