दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर परिसरात पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत कार कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इंदोरे गावातील सुनील दरगुडे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे नातेवाईक समाविष्ट असून ते सर्वजण एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परत येत होते.
प्राथमिक माहितीनुसार, कार्यक्रमावरून परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा अपघात अचानक घडल्याने वाहनातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. कार विहिरीत पडताच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि बचावकार्य सुरू केले.
मृतांमध्ये तीन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. मृतक हे एकाच कुटुंबातील आणि त्यांच्या नातेवाईकांपैकी असून ते दिंडोरी येथील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघातात दरगुडे कुटुंबातील पाच सदस्य आणि चार नातेवाईकांचा मृत्यू झाला.
![]()
अपघातानंतर मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर प्रशासन आणि बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. रात्रीचा अंधार आणि विहिरीची खोली यामुळे बचावकार्य कठीण झाले. कार बाहेर काढून आत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढेपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी पोहोचली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस आणि इतर स्थानिक यंत्रणांनी बचावकार्यामध्ये सहभाग घेतला. पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. अन्य संभाव्य कारणांचाही तपास सुरू आहे.




