भारत अ ने त्रिकोणी एकदिवसीय मालिकेची विजयी सुरुवात करत श्रीलंका अ संघाचा आठ धावांनी पराभव केला. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर भारत अ ने 277 धावा उभारल्या, तर अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या पुनरागमनामुळे श्रीलंका अ संघ 269 धावांवर बाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारत अ ने 50 षटकांत सहा बाद 277 धावा केल्या. संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही, मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने जबाबदारी स्वीकारत शतकी खेळी साकारली. गायकवाडने 114 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने आपले 21 वे लिस्ट-अ शतक पूर्ण केले आणि भारत अ ला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारत अ च्या डावाला बळकटी देण्यात तिलक वर्मानेही महत्त्वाचे योगदान दिले. ऋतुराज आणि तिलक यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली. तिलक वर्माने 97 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. याशिवाय प्रियंश आर्याने 32, आयुष बदोनीने 24 आणि सूर्यांश शेडगेने नाबाद 26 धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमवत भारत अ ने 277 धावांचा स्कोअर उभारला. श्रीलंका अ कडून मोहम्मद शिराजने दोन बळी घेतले, तर चमिका करुणारत्ने, गारुका संकेथ आणि वानुजा सहन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका अ ने चांगली सुरुवात केली. निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. मात्र आयुष बदोनीने सलग दोन विकेट घेत भारत अ ला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने अविष्का फर्नांडोला 45 धावांवर आणि त्यानंतर डिकवेलाला 47 धावांवर बाद केले. त्यानंतर विपराज निगमने नुवानिदु फर्नांडोला बाद केले.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर श्रीलंका अ चा कर्णधार सहान अराचिगे आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली. समरविक्रमाने 46 धावा केल्या, तर अराचिगेने 72 चेंडूंमध्ये 74 धावांची खेळी केली. त्याच्या डावात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

अराचिगे बाद झाला तेव्हा श्रीलंका अ ची धावसंख्या सात बाद 262 होती आणि संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी दबाव निर्माण करत सलग विकेट घेतल्या. श्रीलंका अ ने अवघ्या सात धावांच्या अंतरात शेवटच्या चार विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ 48.5 षटकांत 269 धावांवर बाद झाला.
भारत अ कडून अरशद खान, आयुष बदोनी, अनुकूल रॉय आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अंशुल कंबोजने एक महत्त्वाची विकेट मिळवली.










