भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी किरकोळ वाढीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 126 अंकांच्या वाढीसह 75,441 पातळीवर उघडला, तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 25 अंकांच्या वाढीसह 23,675 पातळीवर व्यवहारास सुरुवात करताना दिसला.
जागतिक बाजारांकडून मिळालेल्या संकेतांमध्ये आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील नरमाईच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 75,000 पातळीच्या वर गेला, तर निफ्टीनेही वाढीसह व्यवहार सुरू केला.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय तणावामध्ये तात्पुरती घट आणि आशियाई बाजारांतील मिश्रित परंतु स्थिर कलामुळे भारतीय बाजाराला सुरुवातीचा आधार मिळाला.
सोमवारी बाजारात मोठी अस्थिरता नोंदवली गेली होती. एका टप्प्यावर सेन्सेक्समध्ये 1,000 हून अधिक अंकांची घसरण झाली होती. मात्र, व्यवहाराच्या अंतिम तासांमध्ये आयटी आणि फार्मा क्षेत्रांमध्ये खरेदी वाढल्याने बाजाराने मोठ्या प्रमाणात सावरला.
जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेने सध्या इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाई पुढे ढकलल्याची माहिती समोर आली. या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारांतील तणाव काहीसा कमी झाला असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही घट नोंदवली गेली. विश्लेषकांच्या मते, भू-राजकीय तणाव कमी झाल्यास भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो.
![]()
मंगळवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये मिश्रित कल दिसून आला. जपानचा Nikkei 225 निर्देशांक सुमारे 0.68% वाढला, तर Topix Index मध्ये 1% पेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली. ऑस्ट्रेलियाचा ASX 200 निर्देशांकही वाढीसह व्यवहार करताना दिसला, तर दक्षिण कोरियाचा Kospi दबावाखाली राहिला. या घडामोडी गुंतवणूकदार जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दर्शवतात.
सोमवारी अमेरिकन शेअर बाजार दबावाखाली बंद झाले. तंत्रज्ञान समभागांतील कमजोरीमुळे Nasdaq Composite मध्ये घसरण नोंदवली गेली. Dow Jones आणि S&P 500 निर्देशांकही मर्यादित घसरणीसह बंद झाले. व्याजदर, महागाई आणि जागतिक तणावांबाबत गुंतवणूकदारांमध्ये सावध भूमिका कायम असल्याचे अमेरिकन बाजारातील हालचालींवरून दिसून आले.
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये किरकोळ घट दिसून आली. अमेरिकेने इराणविरोधातील संभाव्य कारवाई स्थगित केल्याच्या वृत्तानंतर पुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली. WTI Crude सुमारे 1% घसरून प्रति बॅरल जवळपास 107 डॉलरवर पोहोचले, तर Brent Crude देखील घसरणीसह प्रति बॅरल सुमारे 109 डॉलरच्या आसपास व्यवहार करताना दिसले. मात्र, किमती अजूनही उच्च पातळीवर कायम आहेत.











