Pune

पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. ते या सन्मानाचे पहिले परदेशी नागरिक ठरले आहेत. हा त्यांचा 25वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

PM मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने, ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले परदेशी नागरिक ठरले आहेत. आत्तापर्यंत पंतप्रधान मोदी यांना 25 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत, जे जागतिक स्तरावर त्यांच्या प्रभावशाली प्रतिमेचं आणि नेतृत्वाचं दर्शन घडवतात.

त्रिनिदाद आणि टोबॅगोने PM मोदींना दिला सर्वोच्च सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने, ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले परदेशी नागरिक आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कांगालू यांनी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला.

सन्मान स्वीकारताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान भारत आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो यांच्यातील मजबूत आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे. त्यांनी हा सन्मान 140 कोटी भारतीयांच्या वतीने स्वीकारत, देशवासियांचा गौरव असल्याचे सांगितले.

त्रिनिदादच्या माजी पंतप्रधानांनी केली होती घोषणा

या सन्मानाची घोषणा त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या माजी पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी केली होती. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेतृत्वाची, अनिवासी भारतीयांशी असलेल्या त्यांच्या संबंधांची आणि कोविड-19 महामारीच्या काळात केलेल्या मानवी प्रयत्नांची प्रशंसा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, मोदी यांचे नेतृत्व जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

25 वा आंतरराष्ट्रीय सन्मान

त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून मिळालेला हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 25 वा आंतरराष्ट्रीय नागरी सन्मान आहे. यापूर्वी, घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रमानी महामा यांनी त्यांना ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ ने सन्मानित केले होते.

या सन्मानांच्या मालिकेतून हे स्पष्ट होते की, पंतप्रधान मोदी आज जागतिक राजकारणात एक प्रभावशाली नेते म्हणून स्थापित झाले आहेत. विविध देशांकडून सातत्याने सन्मान मिळत असल्यामुळे, जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे.

जूनमध्ये सायप्रसचा सन्मान

जून 2025 मध्ये, सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधान मोदी यांना राजधानी निकोसियामधील राष्ट्रपती भवनात ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III’ ने सन्मानित केले. हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो फक्त अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्तींना दिला जातो.

श्रीलंका आणि मॉरिशसकडूनही मिळाला सन्मान

या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आणि मॉरिशसनेही पंतप्रधान मोदींना आपापल्या सर्वोच्च सन्मानाने गौरविलं होतं. एप्रिल 2025 मध्ये, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी त्यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण’ ने सन्मानित केले होते. हा श्रीलंकेचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे, जो राष्ट्राध्यक्ष आणि सरकारप्रमुखांना दिला जातो.

मार्च 2025 मध्ये, मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात, राष्ट्रपती धर्मबीर गोखूल यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ (GCSK) ने सन्मानित केले होते. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय नेते ठरले.

कुवेत, नायजेरिया आणि डोमिनिकामध्येही सन्मान

डिसेंबर 2024 मध्ये, कुवेतने पंतप्रधान मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ने सन्मानित केले. हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान आहे, जो प्रमुख आंतरराष्ट्रीय नेते आणि राष्ट्राध्यक्षांना दिला जातो.

तसेच, नोव्हेंबर 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांना नायजेरिया भेटीदरम्यान ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ (GCON) ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आजपर्यंत फक्त काही परदेशी नेत्यांना मिळाला आहे, ज्यात राणी एलिझाबेथ यांचाही समावेश आहे.

गयानानेही पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने, 'द ऑर्डर ऑफ एक्सीलेंस' ने गौरविलं. राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांनी हे त्यांच्या दूरदर्शी राजकारणाबद्दल आणि विकसनशील देशांच्या हितासाठी केलेल्या योगदानाला समर्पित केलं.

डोमिनिका आणि पापुआ न्यू गिनीमध्येही सन्मान

गयाना येथे आयोजित भारत-कॅरिकॉम शिखर बैठकीत, डोमिनिकानेही पंतप्रधान मोदींना ‘डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ ने गौरविलं. हा सन्मान कोविड-19 महामारीच्या काळात डोमिनिकाला भारताने केलेल्या मदतीसाठी आणि दोन्ही देशांमधील दृढ होत असलेल्या संबंधांसाठी देण्यात आला.

पापुआ न्यू गिनीनेही पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ ने सन्मानित केले. या सन्मानाला तेथील ‘चीफ’ या उपाधीसारखे मानले जाते.

भाजपचा काँग्रेसवर हल्ला

पंतप्रधान मोदींना मिळत असलेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांवरून भाजपने विरोधकांवरही निशाणा साधला आहे. पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स (Twitter) वर म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना 25 वा आंतरराष्ट्रीय नागरी सन्मान मिळाला आहे, तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांना मिळूनही इतके सन्मान मिळाले नाहीत.

ते म्हणाले की, काँग्रेस परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, पण त्यांच्या नेत्यांना इतक्या दशकांमध्ये फक्त सहा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यांनी याला भारतासाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आणि सांगितले की, आज भारताचे नेतृत्व जागतिक स्तरावर अभिमानाने ओळखले जात आहे.

 

Leave a comment