महिला प्रीमियर लीग 2026 मधील नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात जायंट्सचा 32 धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.
स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सचा डाव 150 धावांवर संपला. श्रेयंका पाटीलने 3.5 षटकांत 23 धावा देत 5 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. 34 धावांवर सोफी डिवाइन (8) बाद झाली. पुढील षटकात बेथ मूनी 14 चेंडूंत 27 धावा करून श्रेयंका पाटीलची शिकार ठरली. कर्णधार अॅश गार्डनर केवळ 3 धावा करून बाद झाली.
श्रेयंका पाटीलने कनिका आहूजा, जॉर्जिया वेअरहॅम (13), काश्वी गौतम (18), तनुजा कंवर (21) आणि रेणुका सिंग (2) यांना बाद करत पाच बळी पूर्ण केले. लॉरेन बेलने 4 षटकांत 29 धावा देत 3 बळी घेतले. गुजरातकडून भारती फुलमाळीने 20 चेंडूंत 39 धावा केल्या.

याआधी गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. आरसीबीची सुरुवात खराब झाली आणि 43 धावांत चार गडी बाद झाले. स्मृती मंधाना (5), ग्रेस हॅरिस (17), दयालन हेमलता (4) आणि गौतम नाईक (9) लवकर बाद झाले.
त्यानंतर राधा यादव आणि ऋचा घोष यांनी डाव सावरला. राधा यादवने 47 चेंडूंत 66 धावा, तर ऋचा घोषने 28 चेंडूंत 44 धावा केल्या. या भागीदारीमुळे आरसीबीने 20 षटकांत 7 गडी बाद 182 धावा केल्या.
या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सलग तिसरा सामना जिंकत WPL 2026 गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले.








