बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांच्यावर, आणि एका अज्ञात व्यक्तीवर, मुंबईतील एका व्यावसायिकाची 60.4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Shilpa Shetty-Raj Kundra: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दोघांविरुद्ध 60.4 कोटी रुपयांची फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा त्यांच्या बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित एका लोन-कम-इन्व्हेस्टमेंट डीलशी संबंधित आहे.
कसा सुरु झाला प्रकार
जुहूचे रहिवासी असलेले व्यावसायिक आणि लोटस कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला हा गुन्हा जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता, परंतु यात समाविष्ट असलेली रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने तो EOW कडे हस्तांतरित करण्यात आला. कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, राजेश आर्य नावाच्या एका व्यक्तीने त्यांची ओळख राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी करून दिली. त्यावेळी दोघेही बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते आणि कंपनीमध्ये त्यांची 87.6% भागीदारी होती.
कर्जापासून गुंतवणुकीपर्यंतचा प्रवास
आरोपांनुसार, राज कुंद्रा यांनी 12% व्याजाने 75 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र, नंतर त्यांनी आणि शिल्पा शेट्टीने कोठारी यांना समजावले की ही रक्कम कर्जाऐवजी गुंतवणूक म्हणून दिली जावी जेणेकरून करांमध्ये (Taxation) सवलत मिळू शकेल. त्यांनी मासिक उत्पन्न आणि मुद्दल परत करण्याचे आश्वासन दिले. एप्रिल 2015 मध्ये, कोठारी यांनी शेअर सबस्क्रिप्शन करारांतर्गत 31.9 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर सप्टेंबर 2015 मध्ये एका पुरवणी करारानुसार 28.53 कोटी रुपये आणखी हस्तांतरित करण्यात आले. अशा प्रकारे एकूण गुंतवणूक 60.4 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टीने वैयक्तिक हमी दिली होती, परंतु सप्टेंबर 2016 मध्ये तिने संचालक पदाचा राजीनामा दिला. नंतर कोठारी यांना समजले की कंपनी आधीपासूनच आर्थिक अडचणीत आहे आणि 2017 मध्ये एका अन्य कराराचे उल्लंघन केल्यामुळे तिच्याविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू झाली आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की जर त्यांना कंपनीच्या वाईट आर्थिक स्थितीबद्दल पूर्वी माहिती असती, तर त्यांनी गुंतवणूक केली नसती.
कायदेशीर कलमे आणि तपास
EOW ने या प्रकरणात फसवणूक (IPC कलम 420), बनावटगिरी (कलम 467, 468, 471) आणि गुन्हेगारी कट (कलम 120B) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या EOW प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते या गोष्टीची तपासणी करत आहेत की गुंतवणुकीच्या रकमेचा वापर कुठे आणि कसा करण्यात आला आणि त्यात इतर लोकही सामील होते का.
बेस्ट डील टीव्ही हे होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होते, ज्याला राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी प्रमोट केले होते. कंपनीने सुरुवातीला आक्रमक मार्केटिंग केले, परंतु काही वर्षांतच तिची आर्थिक स्थिती ढासळली आणि अखेरीस ती बंद पडली.