गुजरातच्या अहमदाबादमध्ये इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्याने इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्याची चाकू मारून हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेत तोडफोड केली आणि रस्त्यावर चक्का जाम केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने मोठा सुरक्षा फौजफाटा तैनात केला.
Crime News: अहमदाबादच्या खोखरा भागात असलेल्या सेवंथ-डे स्कूलमध्ये मंगळवारी (19 ऑगस्ट) किरकोळ वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्याने इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्याला चाकू मारून जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने शाळेत तोडफोड केली आणि रस्त्यावर चक्का जाम केला. पोलिसांनी मोठा सुरक्षा फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
लहानश्या बाचाबाहीतून जीवघेणी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, वादाची सुरुवात किरकोळ धक्काबुक्कीने झाली. सुरुवातीला हा एक साधारण वाद होता, पण इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्याचा राग अनावर झाला आणि त्याने चाकू काढून शाळेबाहेर इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की, जखमी विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी रागाच्या भरात शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केले.
जमावाने शाळेत केली तोडफोड
घटनेची माहिती मिळताच संतप्त लोक शाळेत पोहोचले. जमावाने शाळेत घुसून समोर येईल त्यावर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस, मोटारसायकल आणि गाड्या जमावाच्या निशाण्यावर होत्या. शाळेचे दरवाजे तोडण्यात आले, काचा फोडण्यात आल्या आणि इतर मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
जमावाने शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. पोलिसांची उपस्थिती असूनही लोक शाळेत हिंसा करत राहिले. परिस्थिती इतकी गंभीर होती की पोलिसांना अनेक वेळा लाठीचार्ज करावा लागला.
रस्त्यावर चक्का जाम आणि निदर्शने
हत्येच्या निषेधार्थ स्थानिक लोकांनी शाळेबाहेर रस्त्यावर बसून चक्का जाम केला. जमावाने पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, मणिनगरचे आमदार, डीसीपी बलदेव देसाई आणि ACP घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी बजरंग दल, VHP आणि ABVP चे कार्यकर्ते भगवे फेटे बांधून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत शाळेत पोहोचले. शाळेबाहेर सुमारे 2,000 लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने सुरू केली.
तणावपूर्ण वातावरण, मोठा सुरक्षा फौजफाटा तैनात
घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. जमाव सतत पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करत होता.
बजरंग दल, VHP आणि ABVP च्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन आपला विरोध नोंदवला. लोक सतत ‘पोलिस हाय-हाय’ आणि ‘न्याय पाहिजे’ अशा घोषणा देत होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वेळा लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
प्रशासन आणि पोलिसांची प्रतिक्रिया
पोलिसांनी सांगितले की, घटनेची पूर्ण चौकशी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी शाळा आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, वादाची सुरुवात किरकोळ भांडणातून झाली, परंतु दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांच्या राग आणि तणावामुळे याला हिंसक वळण लागले. प्रशासनाने शाळेची सुरक्षा वाढवली असून परिसरात प्रवेश नियंत्रित केला जात आहे.