भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज केसी करियप्पा यांनी वयाच्या 31व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे जाहीर केली.
IPL 2026 च्या प्रारंभाला अद्याप दोन महिन्यांहून अधिक कालावधी असताना, या निर्णयाची घोषणा करण्यात आली. करियप्पा यांनी आपल्या पोस्टमध्ये क्रिकेट प्रवासाची सुरुवात गल्ली क्रिकेटपासून झाल्याचे नमूद केले असून, स्टेडियमच्या प्रकाशझोतात जर्सी परिधान करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याचे म्हटले आहे. त्यांनी BCCI क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केल्याचे स्पष्ट केले आहे.
केसी करियप्पा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, 'ज्या गल्लींमधून हे सर्व सुरू झाले तिथून स्टेडियमच्या प्रकाशझोतात आणि अभिमानाने जर्सी घालण्यापर्यंत, मी तो स्वप्नांचा प्रवास जगलो ज्याची मी कधी केवळ कल्पनाच केली होती. आज मी BCCI क्रिकेटमधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करतो.'
या घोषणेनंतर क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात निवृत्ती घेणे क्वचितच दिसून येते. करियप्पा भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी टी20 लीगमध्ये खेळण्याचा विचार करत असल्याचे मानले जात आहे. BCCI च्या नियमांनुसार, निवृत्तीनंतरच भारतीय खेळाडूंना परदेशी टी20 किंवा इतर आंतरराष्ट्रीय लीगमध्ये सहभागी होता येते.

केसी करियप्पा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिझोराम संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कारकिर्दीतील आकडेवारीनुसार त्यांनी 14 फर्स्ट क्लास सामन्यांत 75 विकेट्स घेतल्या, 20 लिस्ट-ए सामन्यांत 24 विकेट्स मिळवल्या, तर 58 टी20 सामन्यांत 58 विकेट्स घेतल्या. विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्येही त्यांनी मिझोरामसाठी सहभाग घेत संघासाठी योगदान दिले.
IPL मध्ये करियप्पा यांनी कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघांचे प्रतिनिधित्व केले. 2015 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्या हंगामात त्यांनी केवळ एक सामना खेळला असून त्या सामन्यात एबी डिव्हिलियर्स यांना बाद केले होते. 2016 मध्ये पंजाब किंग्सने त्यांना 80 लाख रुपयांना खरेदी केले. पुढील दोन हंगामांत त्यांनी 9 सामने खेळून 7 विकेट्स घेतल्या. IPL 2019 मध्ये त्यांची कोलकाता नाइट रायडर्समध्ये पुनरागमन झाले, मात्र त्यांना फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली.
IPL मधील त्यांची कारकीर्द दीर्घ नसली तरी 2.4 कोटी रुपयांच्या लिलावामुळे आणि त्यांच्या कामगिरीमुळे ते चर्चेत आले होते.









