उत्तर प्रदेश जमीयत दावतुल मुस्लिमीनचे संरक्षक आणि प्रसिद्ध देवबंदी उलेमा मौलाना कारी इसहाक गोरा यांनी मुस्लिम समाजात मुलींच्या वाढत्या भरकटण्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध देवबंदी उलेमा आणि जमीयत दावतुल मुस्लिमीनचे संरक्षक मौलाना कारी इसहाक गोरा यांनी मुस्लिम समाजात मुलींच्या वाढत्या भरकटण्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मुलींचे आपले घर-कुटुंब आणि धर्म सोडण्याचे कारण शिक्षणाचा अभाव नाही, तर योग्य संस्कार आणि कौटुंबिक वातावरणाचा अभाव आहे.
मौलाना गोरा यांनी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, समाजात या मुद्द्यावर विविध चर्चा होतात. काही लोक मुलींच्या भरकटण्याला जास्त शिक्षण किंवा शिक्षणाचा परिणाम मानतात, तर काहीजण याला अधिक स्वातंत्र्यामुळे जोडतात. पण त्यांचे म्हणणे आहे की, याचे खरे कारण हे नाही.
शिक्षणावर नव्हे, तर संस्कारांवर भर
![]()
मौलाना इसहाक गोरा म्हणाले, “कुटुंब आपल्या मुलांना जगाचे शिक्षण देण्यासाठी कष्ट करते, परंतु संस्कार, नैतिक आणि धार्मिक शिक्षणावर तितके लक्ष दिले जात नाही.” त्यांनी उदाहरण देऊन सांगितले की, आज भाऊ-बहिणींना समजावताना अनेकदा रागाचा आधार घेतला जातो. ते म्हणाले,
'केवळ राग आणि टोमणा मारून समजावल्यास, ते प्रेम आणि बुद्धिमत्तेच्या अभावाचे लक्षण आहे. मुलींना रोखणे हा उपाय नाही. उलट त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, त्यांचे म्हणणे ऐकणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि योग्य संस्कार करणे हाच योग्य मार्ग आहे.'
मौलाना गोरा यांनी पुन्हा सांगितले की, मुलींना शिक्षण देणे धोकादायक नाही, तर संस्कारांकडे दुर्लक्ष करणे हा खरा धोका आहे. कुटुंबात सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण असावे, जेणेकरून मुली योग्य निर्णय स्वतः घेऊ शकतील.
मुली घर सोडून इतर धर्म स्वीकारत आहेत
मौलाना इसहाक गोरा यांनी मुस्लिम कुटुंबांना आवाहन केले की, घरातील वातावरण असे असावे की, ज्यात सुरक्षितता, प्रेम, विश्वास आणि आदर जाणवेल. त्यांनी सांगितले की, धार्मिक आणि नैतिक शिक्षणाला पुन्हा कुटुंबाची प्राथमिकता बनवली पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले, “जेव्हा घरात संस्कार मजबूत असतील, तेव्हा कोणतीही बाह्य शक्ती मुलींना चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही. समाजात मुलींना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कुटुंबाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशाच्या विविध भागातून अशा बातम्या समोर आल्या आहेत की, काही मुली घर सोडून इतर धर्म स्वीकारत आहेत. मौलाना गोरा यांच्या मते, याचे प्रमुख कारण सोशल मीडिया, मोबाईल, मैत्री आणि बदलती जीवनशैली आहे.






