Pune

ऑस्करमध्ये कमल हासन आणि आयुष्मान खुराना यांना सदस्यत्व

ऑस्करमध्ये कमल हासन आणि आयुष्मान खुराना यांना सदस्यत्व

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक, द अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर) च्या सदस्यत्वात सामील होणे कोणत्याही कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असते.

ऑस्कर: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते कमल हासन आणि बहुमुखी कलाकार आयुष्मान खुराना यांना यावर्षी प्रतिष्ठित अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर अकादमी) मध्ये सदस्य बनण्याचे निमंत्रण मिळाले आहे. याचा अर्थ, हे दोन्ही कलाकार केवळ भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणार नाहीत, तर ऑस्कर पुरस्कारांसाठी मतदान प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतील.

गुरुवार, २६ जून २०२५ रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, यावेळी एकूण ५३४ नवीन लोकांना द अकॅडमीच्या सदस्यत्त्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या ५३४ सदस्यांमध्ये भारतामधून अनेक नावांचा समावेश आहे, ज्यात कमल हासन आणि आयुष्मान खुराना यांच्याव्यतिरिक्त कास्टिंग डायरेक्टर करण माळी, सिनेमॅटोग्राफर रणवीर दास, वेशभूषाकार मॅक्सिमा बसू, माहितीपट निर्माते स्मृती मुंदडा आणि दिग्दर्शक पायल कपाडिया यांचाही समावेश आहे.

हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे ​​सन्मान मानले जात आहे, कारण द अकॅडमीचे सदस्यत्व मिळणे केवळ लोकप्रियतेची बाब नाही, तर चित्रपटसृष्टीतील योगदानाला जागतिक मान्यता मिळवण्याचे प्रतीक आहे.

हॉलिवूडमधील तारेही सामील होणार

यावर्षी ज्या आंतरराष्ट्रीय कलाकारांना ऑस्कर अकादमीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण मिळाले आहे, त्यामध्ये अनेक प्रसिद्ध हॉलिवूड स्टार्सचाही समावेश आहे. यामध्ये एरियाना ग्रांडे, सेबास्टियन स्टेन, जेसन मोमोआ, जेसन स्ट्रॉन्ग, ऑब्रे प्लाझा, मार्गारेट क्वाली, माइक फेस्ट, मोनिका बारबरो आणि गिलियन अँडरसन यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. जर या ५३४ नवीन सदस्यांनी आपले निमंत्रण स्वीकारले, तर अकादमीच्या सदस्यांची एकूण संख्या वाढून ११,१२० होईल, ज्यापैकी १०,१४३ सदस्य मतदानामध्ये भाग घेण्यास पात्र असतील.

  • अभिनेत्री आणि गायिका एरियाना ग्रांडे (Ariana Grande)
  • अभिनेता सेबास्टियन स्टेन (Sebastian Stan)
  • अभिनेता जेरेमी स्ट्रॉन्ग (Jeremy Strong)
  • अभिनेता जेसन मोमोआ (Jason Momoa)
  • अभिनेत्री ऑब्रे प्लाझा (Aubrey Plaza)
  • अभिनेत्री मार्गारेट क्वाली (Margaret Qualley)
  • अभिनेता माइक फेस्ट (Mike Fest)
  • अभिनेत्री मोनिका बारबरो (Monica Barbaro)
  • अभिनेत्री गिलियन अँडरसन (Gillian Anderson)

ऑस्कर अकादमीचे सदस्यत्व का खास आहे?

ऑस्कर पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानला जातो. अकादमीचे सदस्यत्व मिळवणे म्हणजे आपण त्या हजारो सर्जनशील व्यावसायिकांमध्ये सामील होता, ज्यांना जगभरातील चित्रपटांसाठी मतदान करण्याचा अधिकार असतो. हे सदस्यत्व कोणत्याही कलाकार किंवा तंत्रज्ञाच्या कारकिर्दीत अभिमानाचे प्रतीक मानले जाते.

कमल हासन आणि आयुष्मान खुराना हे दोघेही त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी आणि निवडक चित्रपटांसाठी ओळखले जातात. कमल हासन यांनी दशकाहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेले, तर आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या हटके चित्रपटांमुळे आणि सामाजिक विषयांवरील कथांमधून खास ओळख निर्माण केली.

पुढील ऑस्कर कधी होणार?

अकॅडमीने हे देखील स्पष्ट केले आहे की, ऑस्कर २०२६ साठी मतदान १२ ते १६ जानेवारी दरम्यान होईल आणि नामांकनांची अधिकृत घोषणा २२ जानेवारी रोजी केली जाईल. त्यानंतर भव्य सोहळा १५ मार्च २०२६ रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाईल.

Leave a comment