अमेरिकन टॅरिफच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेवरील पारंपरिक अवलंबित्व कमी करून निर्यात वाढवणे, नवीन गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक व्यापार भागीदारी मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि अमेरिकन शुल्कांमुळे निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा आपल्या आर्थिक धोरणात बदल करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने मार्क कार्नी या आठवड्यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्याला कॅनडाच्या नव्या व्यापार धोरण आणि निर्यात विविधीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
कार्नी यांनी अनिश्चित जागतिक परिस्थितीत कॅनडा आपल्या नियंत्रणातील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल, असे संकेत दिले आहेत. पुढील दहा वर्षांत अमेरिकेबाहेरील निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे. अमेरिकन शुल्कांमुळे गुंतवणूक कमकुवत होत असल्याचे त्यांनी म्हटले असून कॅनडाने नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
दौऱ्याची सुरुवात भारतातून होणार असून पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार ते गुरुवारी मुंबईत पोहोचतील. मुंबईत त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांवर चर्चा होणार आहे.
![]()
मुंबईत कार्नी भारतीय उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींशीही भेट घेणार आहेत. कॅनडातील गुंतवणुकीच्या संधी मांडणे आणि दीर्घकालीन आर्थिक भागीदारी मजबूत करणे हा या बैठकींचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. तंत्रज्ञान, ऊर्जा आणि कृषी क्षेत्रात सहकार्याच्या संधी असल्याचे कॅनडाचे मत आहे.
भारत दौऱ्यानंतर कार्नी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे जाणार आहेत. तेथे ते ऑस्ट्रेलियन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. तसेच त्यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक धोरणावर चर्चा होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दौऱ्याचा अंतिम टप्पा जपानमध्ये होणार असून टोकियो येथे कार्नी जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांची भेट घेणार आहेत. स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि अन्नसुरक्षा या विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जा आणि क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा दोन्ही देशांचा मानस असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कॅनडाची अर्थव्यवस्था दीर्घकाळ अमेरिकेशी निकट संबंधात राहिली आहे. अलीकडील शुल्क आणि व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ओटावा नव्या धोरणात्मक पर्यायांचा विचार करत आहे. कार्नी यांचा हा दौरा निर्यात विविधीकरण, पुरवठा साखळीचे विविधीकरण आणि मोठ्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
बदलत्या जागतिक परिस्थितीत आर्थिक स्थैर्यासाठी लवचिकता आणि विविधता आवश्यक असल्याचे कार्नी यांनी आपल्या विधानात म्हटले आहे.










