डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन वित्तीय सेवांचा वापर वाढल्याने आधार कार्डच्या गैरवापरातून फसव्या कर्जांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या माहितीस किंवा संमतीशिवाय त्यांच्या नावावर कर्जे घेतली जात असल्याचे आढळून येत आहे. अशा कर्जांमुळे संबंधित व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर घटतो आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात.
बहुतेक वेळा ही फसवणूक तेव्हा समोर येते, जेव्हा बँक किंवा वसुली एजन्सीकडून थकबाकीबाबत कॉल किंवा नोटीस येते, किंवा अचानक क्रेडिट स्कोअर कमी झाल्याचे लक्षात येते. आधार कार्डशी संलग्न असलेल्या विविध सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, ठगांकडून वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आधार कार्ड सध्या बँक खाते, कर्ज, मोबाईल कनेक्शन आणि विविध सरकारी योजनांशी जोडलेले आहे. त्यामुळे आधारशी संबंधित माहिती चुकीच्या हाती गेल्यास ती आर्थिक फसवणुकीसाठी वापरली जाण्याचा धोका वाढतो.

आपल्या नावावर कोणतेही अनधिकृत कर्ज चालू आहे का, याची खात्री करण्यासाठी क्रेडिट रिपोर्ट तपासणे हा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. CIBIL, Experian आणि Equifax यांसारख्या क्रेडिट ब्युरो वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट पाहण्याची सुविधा देतात. या अहवालामध्ये संबंधित व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्ड्सची सविस्तर माहिती उपलब्ध असते.
याशिवाय, अनेक बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या मोबाइल अॅप्स आणि संकेतस्थळांवर कर्ज स्थिती पाहण्याची सुविधा देतात. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी केल्यानंतर, आपल्या नावावर कोणती कर्जे सक्रिय आहेत, याची माहिती मिळते.
तपासणीदरम्यान आपण कधीही न घेतलेले कर्ज आढळल्यास ते दुर्लक्षित करणे योग्य ठरत नाही. अशा वेळी संबंधित बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेशी तात्काळ संपर्क साधून लेखी तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करणे आणि जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम सेलमध्ये अहवाल नोंदवणे गरजेचे आहे. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे क्रेडिट रेकॉर्डचे संरक्षण होऊ शकते आणि पुढील आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.







