टी20 विश्व कप 2026 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा 57 धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत ठोस कामगिरी नोंदवली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात आक्रमक झाली. कर्णधार ऐडन मार्करमने 32 चेंडूंत 59 धावांची खेळी करत संघाच्या डावाला भक्कम पाया घातला. त्याला साथ देताना यष्टीरक्षक फलंदाज रायन रिकेल्टनने 21 चेंडूंत 33 धावा केल्या.
मधल्या फळीत काही गडी बाद झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा धावगतीवर परिणाम झाला नाही. अखेरीस डेव्हिड मिलरने 23 चेंडूंत नाबाद 39 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्सने 19 चेंडूंत 34 धावांची खेळी केली. या योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 213 धावा केल्या.
![]()
कॅनडाकडून अंश पटेल सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 31 धावा देत तीन गडी बाद केले. कर्णधार दिलप्रीत बाजवाने एक विकेट घेतली, मात्र उर्वरित गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर अवघ्या 45 धावांत चार गडी बाद झाले. लुंगी एनगिडीने अचूक गोलंदाजी करत कॅनडाच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.
कॅनडाकडून नवनीत धालीवालने 64 धावांची खेळी करत प्रतिकार केला, मात्र दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कॅनडाचा संघ 20 षटकांत 156 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि सामना 57 धावांनी गमावला.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार षटकांत 31 धावा देत चार गडी बाद केले, तर मार्को जॅन्सनने 30 धावांत दोन विकेट घेतल्या. एनगिडीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.








