सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार बैठकीनंतर त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. या निर्णयाला महायुती सरकारकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यातील वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीपूर्वी त्या शनिवारी सकाळी आपल्या पुत्र पार्थ पवार यांच्यासह मुंबईत दाखल झाल्या.

मुंबईत आगमनानंतर सुनेत्रा पवार दक्षिण मुंबईतील दिवंगत अजित पवार यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘देवगिरी’ येथे गेल्या. राज्याच्या राजकारणात या घडामोडीकडे महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्रातील प्रभावी नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

62 वर्षीय सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सदस्य नाहीत. तरीही पक्षाकडून त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून, त्यात सुनेत्रा पवार यांची औपचारिकरित्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, पक्षातील सर्व आमदार या निर्णयाच्या समर्थनात असून सुनेत्रा पवार यांची सर्वसम्मतीने नेतेपदी निवड होईल.

या निर्णयाची पूर्वकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा पवार कुटुंबातील सदस्यांना नव्हती, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनुसार, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयाची माहिती नव्हती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि भारतीय जनता पक्ष त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देईल. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले, आम्ही अजित दादा यांच्या कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उभे आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, महायुती सरकार त्यास समर्थन देईल.

सुनेत्रा पवार यांनी दीर्घकाळ सक्रिय राजकारणापासून अंतर ठेवले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी झाला होता, मात्र त्यात सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि त्यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला. आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेत आणखी वाढ झाली आहे.

 

Leave a comment