एअर कॅनडाचे विमान AC2259 हॅलिफॅक्स विमानतळावर उतरताना गिअर तुटल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सर्व 181 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवली, तर विमान सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एअर कॅनडा: शनिवारी रात्री हॅलिफॅक्स विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. एअर कॅनडाची फ्लाइट AC2259 सेंट जॉनहून हॅलिफॅक्सला जात असताना, उतरताना अपघातग्रस्त होण्यापासून वाचली. विमानाचे लँडिंग गिअर तुटल्याने विमान धावपट्टीवर घसरत जाऊन आगीच्या कचाट्यात सापडले. या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. घटनेच्या व्हिडिओमध्ये विमानाचे पंख धावपट्टीवर घासताना दिसत होते, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली होती.
सर्व प्रवासी सुरक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात असलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात लागलेल्या आगीमुळे परिस्थिती गंभीर झाली होती, परंतु अग्निशमन दलाच्या टीमने घटनास्थळी तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेसोबत आणखी एक अपघात
ही घटना काही तासांपूर्वी दक्षिण कोरियामधील मुआन विमानतळावर झालेल्या एका मोठ्या विमान अपघातानंतर घडली. दक्षिण कोरियामध्ये बोईंग 737 विमान उतरताना लँडिंग गिअर उघडण्यात अयशस्वी ठरल्याने त्याचा स्फोट झाला आणि 179 लोकांचा मृत्यू झाला, फक्त दोन लोक वाचले होते.
विमान सुरक्षेवर प्रश्न
या घटनांनंतर विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, विमान कंपन्यांनी विमानाची देखभाल आणि सुरक्षा मानके अधिक कठोर करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघाताची चौकशी सुरू आहे आणि विमानाचे झालेले नुकसान तपासले जात आहे.
अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
हॅलिफॅक्स विमानतळावर झालेल्या या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. या दरम्यान, विमानाचे तुटलेले लँडिंग गिअर तपासले जात आहे, जेणेकरून या घटनेसाठी कोणती तांत्रिक त्रुटी कारणीभूत होती, हे शोधता येईल.