१२ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दिल्लीला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) आमदार रेखा गुप्ता यांना उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नवी दिल्ली: २७ वर्षांनंतर सत्तेत परतफर्ती केल्यानंतर, भाजपाच्या नवीन सरकारचे शपथविधी आज (२० फेब्रुवारी) रोजी पार पडला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर नवीन मुख्यमंत्रीची वाट पाहण्यास पूर्णविराम देत रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारंभात रेखा गुप्ता केशरी साडीत दिसल्या आणि त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांच्यापूर्वी आतिशी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी हे पद भूषवले आहे.
रेखा गुप्ता शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या तीन वेळा आमदार असलेल्या बंदना कुमारी यांना मोठ्या फरकाने हरवलं. त्यांच्या विजयासोबतच भाजपानं दिल्लीच्या राजकारणात नवीन अध्याय जोडला आहे आणि २७ वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत परतफर्ती केली आहे.
रेखा गुप्ता यांच्यासोबत या मंत्र्यांनीही शपथ घेतली
दिल्लीतील भाजपा सरकारच्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यानंतर मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रवेश वर्मा यांनी सर्वात आधी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंदर सिंह इंद्राज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळीच राजपत्र प्रसिद्ध करून या सर्वांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती.
शपथविधी नंतर लवकरच सर्व मंत्र्यांच्या खातींचे वाटप केले जाईल. भाजपानं या मंत्रिमंडळाद्वारे जाट, पंजाबी आणि पूर्वांचल समाजांच्या संतुलनाकडे विशेष लक्ष दिले आहे. हा शपथविधी समारंभ दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात आयोजित करण्यात आला होता, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, खासदार, एनडीएच्या सहयोगी पक्षांचे नेते आणि सुमारे ५० हजार नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.