भीषण उष्णतेनंतर आणि मान्सूनच्या प्रारंभीच्या कमकुवत टप्प्यानंतर भारतातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 1 जुलै 2026 रोजी देशातील 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस, जोरदार वादळी वारे आणि काही भागांत गारपिटीचा इशारा जारी केला आहे. विभागाच्या माहितीनुसार, अनेक भागांत ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने शेतकरी, प्रवासी आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, मान्सून आता हळूहळू उत्तर आणि मध्य भारतात सक्रिय होत असून, अनेक राज्यांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
IMD च्या अंदाजानुसार उत्तर, पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत व्यापक पावसाची शक्यता आहे. ज्या राज्यांसाठी इशारा जारी करण्यात आला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. या राज्यांतील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागांत 1 जुलै रोजी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. पावसानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून, मागील काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाडा आणि उष्णतेत घट होऊ शकते.
![]()
उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि मध्य भागांसह बुंदेलखंड प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आग्रा, मथुरा, कानपूर, झाशी, ललितपूर, गोरखपूर, वाराणसी, प्रयागराज, बलिया, मिर्झापूर, गोंडा, बहराइच, सिद्धार्थनगर आणि आसपासच्या जिल्यांत मुसळधार पावसासह ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. हवामान विभागाने सखल भागांत पाणी साचणे आणि वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, मुजफ्फरपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, किशनगंज, कटिहार, भागलपूर आणि अररिया यांसह अनेक जिल्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांत वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. झारखंडमधील रांची, जमशेदपूर, देवघर, धनबाद, गुमला, साहेबगंज आणि इतर जिल्यांसाठीही मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागांत सततच्या पावसामुळे भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्तराखंडमधील नैनीताल, चमोली, बागेश्वर, रुद्रप्रयाग आणि पिथौरागढ येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, कुल्लू आणि कांगडा येथेही पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या राज्यांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आसाममध्ये आधीपासून सुरू असलेली पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, तर सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो. राजस्थानमधील जयपूर, अजमेर, उदयपूर, कोटा, भीलवाडा आणि चित्तौडगड यांसह अनेक जिल्यांत पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे कृषी कामकाजाला गती मिळू शकते.











