भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची अधिकृत घोषणा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर भारतावर लागू असलेला रेसिप्रोकल टॅरिफ 25 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला.
या घोषणापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये या कराराला भारत-अमेरिका संबंधांसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले.
अमेरिकेने टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे भारतीय निर्यातदारांना थेट लाभ मिळणार आहे. मेड इन इंडिया उत्पादने आता अमेरिकन बाजारात कमी शुल्कासह प्रवेश करतील. यामुळे भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मक क्षमता वाढेल.
या करारापूर्वी अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून भारतावर 25 टक्के अतिरिक्त पेनल्टी टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकन टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अमेरिका हा 25 टक्के पेनल्टी टॅरिफ हटवण्याच्या तयारीत आहे. अधिकाऱ्यांच्या मते भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे ही नरमाई दर्शवण्यात आली आहे. मात्र व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की कराराची अट अशी आहे की भारताने रशियाकडून तेलाची खरेदी पूर्णपणे बंद करावी.
![]()
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये दावा केला की पंतप्रधान मोदी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास आणि अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झाले आहेत. त्यांनी असेही नमूद केले की गरज भासल्यास भारत व्हेनेझुएलाकडूनही तेल खरेदी करू शकतो. ट्रम्प यांच्या मते हे पाऊल रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीच्या दिशेने उपयुक्त ठरू शकते.
ट्रम्प यांनी आणखी दावा केला की बाय अमेरिकन धोरणांतर्गत भारत अमेरिका कडून 500 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीची खरेदी करणार आहे. या दाव्यावर भारताकडून अद्याप सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की मेड इन इंडिया उत्पादनांवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी होणे भारतातील 1.4 अब्ज लोकांसाठी सकारात्मक आहे आणि हे दोन्ही देशांतील मजबूत होत असलेल्या संबंधांचे द्योतक आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतंत्र पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करताना ते आपल्या जवळच्या मित्रांपैकी एक असून शक्तिशाली आणि आदरणीय नेते असल्याचे म्हटले. चर्चेदरम्यान व्यापार, ऊर्जा धोरण आणि रशिया-युक्रेन युद्ध यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.











