आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 उपांत्य फेरीत इंडिया A कडून श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय, अंतिम फेरीत प्रवेश

बँकॉक येथे सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 उपांत्य फेरीत इंडिया A ने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. श्रीलंका 118 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने 13.3 षटकांत लक्ष्य गाठले.

थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

उपांत्य फेरीतील सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजीने संपूर्ण डावावर नियंत्रण ठेवले आणि श्रीलंका संघ 19.4 षटकांत 118 धावांवर बाद झाला. या डावात संजना कविंदीने 35 चेंडूत 31 धावा केल्या. शशिनी गिम्हानीने 17 चेंडूत 22 धावा केल्या, तर हंसिमा करुणारत्ने आणि सथ्या संदीपनी यांनी अनुक्रमे 14 आणि 15 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजीत कर्णधार राधा यादव हिने 3.4 षटकांत 19 धावा देत 4 बळी घेतले. प्रेमा रावतने 4 षटकांत 9 धावा देत 2 बळी घेतले, तर तनुजा कंवर हिनेही 2 बळी मिळवले. शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे श्रीलंकेला कमी धावसंख्येवर रोखण्यात भारताला यश आले.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 उपांत्य फेरीत इंडिया A कडून श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय, अंतिम फेरीत प्रवेश

119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली, मात्र 30 धावांवर पहिला गडी गमावला. त्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा यांनी 24 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली. वृंदा दिनेशने 20 चेंडूत नाबाद 42 धावा करत संघाला 13.3 षटकांत लक्ष्य गाठण्यास मदत केली.

या विजयासह इंडिया A ने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. अंतिम सामना 22 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. भारताचा सामना बांग्लादेश किंवा पाकिस्तान यांच्याशी होणार असून या दोन्ही संघांमधील उपांत्य सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.

Leave a comment