भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी वर्ल्ड कप क्वालिफायर्सच्या उपांत्य फेरीत इटलीवर 1-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि महिला हॉकी वर्ल्ड कपसाठी पात्रता निश्चित केली.
उपांत्य फेरीतील सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने सर्कलमध्ये दोन वेळा प्रवेश करून गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु इटलीनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले करत भारताच्या गोलसमोर अनेकदा धोका निर्माण केला. भारताच्या बचावफळीने आणि गोलरक्षक बिचू देवी खारीबाम यांनी इटलीला पहिल्या क्वार्टरमध्ये गोल करण्यापासून रोखले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने अनेक गोल संधी निर्माण केल्या, मात्र पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. भारताला 18व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीत कौरने घेतलेला शॉट इटलीची गोलरक्षक लुसिया इनेस कारुसो यांनी रोखला. 27व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु नवनीतचा शॉट गोलपोस्टपासून दूर गेला.
![]()
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला इटलीने आक्रमण वाढवले. एमीलिया म्युनिटिसने भारतीय बचावपटूंना चकवले, मात्र बिचू देवी खारीबाम यांनी बचाव केला. 40व्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि मनीषा चौहानने घेतलेल्या शॉटने इटलीच्या बचावफळीला भेदत सामन्यातील एकमेव गोल केला.
अंतिम क्वार्टरमध्ये भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही. शेवटच्या मिनिटांमध्ये इटलीने बरोबरीसाठी प्रयत्न केले, परंतु भारताच्या बचावफळीने आणि गोलरक्षकाने इटलीला गोल करू दिला नाही.
या विजयामुळे भारताने क्वालिफायर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून अंतिम सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. महिला हॉकी वर्ल्ड कप 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या यजमानपदाखाली आयोजित केला जाणार आहे.










