विक्रमादित्यानं पुन्हा एकदा वेताळाला झाडावरून खाली उतरवून खांद्यावर घेतलं आणि चालायला सुरुवात केली. वेताळानंही आपली कथा सांगायला सुरुवात केली. फार पूर्वीची गोष्ट आहे. माणिक्यपूरच्या विशाल राज्यावर राजा पुण्यव्रताचं राज्य होतं. दयाळू आणि बुद्धिमान असल्यामुळे ते प्रजेला खूप प्रिय होते. ते एक अतिशय पराक्रमी राजा होते. आपल्या युद्ध कौशल्यानं त्यांनी अनेक राज्यांवर विजय मिळवला होता. राजाला शिकारीमध्ये खूप आनंद येत असे.
एक दिवस राजा जंगलात शिकार खेळायला गेला. एका अतिशय सुंदर चितळलेल्या हरणांचा पाठलाग करत तो जंगलात खूप आतपर्यंत गेला. अचानक हरण त्याच्या दृष्टीआड झालं, पण राजा आपला रस्ता विसरून जंगलात भरकटला. तासन् तास जंगलात फिरूनही त्याला रस्ता सापडला नाही. अंधार पडायला लागला होता. भूक, तहान आणि थकवा यांमुळे राजाची अवस्था खूप वाईट झाली होती. तो आपल्या घोड्यावरून खाली उतरला, इतक्यात त्याला हातात लालटेन घेऊन कुणीतरी आपल्या दिशेने येताना दिसलं.
सावध राजानं तत्काळ आपली तलवार काढली. तो कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी तयार होता. मग त्याला वाटलं की तो माणूस आपली मदत करायला आला आहे. जवळ येऊन तो म्हणाला, “महाराज, मला वाटतं तुम्ही तुमचा रस्ता विसरला आहात.” “तू बरोबर बोलत आहेस,” राजा उत्तरला. तो पुन्हा म्हणाला, “मी तुमच्यासाठी जेवण आणि पाणी आणलं आहे. तुम्ही खूप थकला आहात. आता आराम करा. सकाळी आपण रस्ता शोधू.”
त्या युवकाच्या विनंतीवरून राजानं त्यानं आणलेलं जेवण आणि पाणी घेतलं. जेवण करून जसा तो झाडाखाली झोपला, तशी त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर राजाने त्या युवकाला हातात काठी घेऊन पहारा देताना पाहिलं. राजा त्याच्या भक्तीने प्रसन्न झाला आणि त्यानं त्याचं नाव विचारलं. युवक उत्तरला, “महाराज, माझं नाव प्रताप आहे.” राजाने पुन्हा विचारलं, “काय तू माझ्या दरबारात राहून माझी सेवा करशील?”
प्रतापनं होकार दिला. त्याला खूप आनंद झाला. ते दोघे रस्ता शोधत महालात आले आणि प्रताप महालात दरबारी म्हणून राजाची सेवा करू लागला. बराच वेळ निघून गेला. आनंदी आणि समाधानी प्रतापानं एक दिवस परत जंगलात त्याच ठिकाणी जायचं ठरवलं, जिथे तो पहिल्यांदा राजाला भेटला होता. तिथे पोहोचल्यावर त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तिला पाहताच तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्यानं तिच्यासमोर व्यक्त केली.
त्याचा प्रस्ताव ऐकून मुलगी म्हणाली, “तुम्ही उद्या या, तेव्हा मी तुम्हाला माझा निर्णय सांगेन.” प्रताप परत गेला, पण रात्रभर त्याच मुलीबद्दल विचार करत राहिला. त्याला एका क्षणासाठीही झोप लागली नाही. सकाळी तो राजाकडे गेला आणि त्यानं सगळी गोष्ट खरी-खरी सांगितली. राजा आणि प्रताप दोघेही सोबत जंगलात पोहोचले. ती मुलगी वाट बघत होती. तिला राजा येणार याचा अंदाज नव्हता. राजाला समोर पाहून ती म्हणाली, “महाराज, कृपया तुम्ही माझ्याशी लग्न करून मला आपली राणी बनवा.”
मुलीचं बोलणं ऐकून राजा आणि प्रताप दोघांनाही धक्का बसला. प्रताप उत्तरला, “महाराज, ही मुलगी राणी बनण्यासाठी योग्य आहे. जर तुमची इच्छा तिच्याशी लग्न करण्याची असेल, तर तुम्ही नक्की करा. मी तुमच्यासाठी माझं प्रेम सोडू शकतो.” प्रतापाच्या स्वामीभक्तीने प्रसन्न होऊन राजा त्या मुलीला म्हणाला, “या युवकाचं तुझ्यावर प्रेम आहे. आपल्या दरबारीनं निवडलेल्या महिलेशी मी कधीही लग्न करू शकत नाही आणि तोही प्रतापसारखा स्वामीभक्त सेवक. प्रताप तुझी खूप काळजी घेईल. तू त्याच्याशी लग्न करून सर्व राजेशाही थाटाचा आनंद घेशील.”
विवाहाचा मुहूर्त काढून राजाने प्रताप आणि त्या मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. दोघेही सुखाने राहू लागले. गोष्ट संपवून वेताळानं प्रश्न विचारला, “महाराज, सांगा दोघांमध्ये कोण जास्त उदार होतं? राजा की त्याचा दरबारी?” राजा विक्रमादित्यानं उत्तर दिलं, “राजा आणि त्याचा दरबारी दोघेही सारखेच उदार होते. राजासाठी प्रताप आपल्या प्रेमाचा त्याग करायला तयार होता, तर राजानं त्या प्रतापाला नाकारलं, कारण त्याच्या दरबारीनं ती मुलगी स्वतःसाठी निवडली होती. राजानं एक शासक असल्यामुळे सहजपणे त्या मुलीशी लग्न केलं असतं. राजा नैतिक मूल्यांवर खूप विश्वास ठेवत होता. एका राजाची शोभाही यातच आहे आणि यामुळेच राजाची उदारता मोठी आहे.” वेताळ योग्य उत्तर मिळाल्यानं प्रसन्न झाला आणि स्वतःला राजापासून सोडवून हवेत उडत झाडावर जाऊन लटकला.