बेताळ झाडाच्या फांदीवरून आनंदाने लटकलेला होता, तेवढ्यात विक्रमादित्याने पुन्हा तिथे पोहोचून त्याला झाडावरून खाली उतरवले आणि आपल्या खांद्यावर घेऊन चालू लागला. रस्त्यात बेताळाने आपली कथा सांगायला सुरुवात केली. पुरुषपूरचा राजा देवमाल्य आपल्या प्रजाजनांमध्ये आपल्या साहस आणि बुद्धीमत्तेसाठी ओळखला जात होता. त्याला तीन राण्या होत्या, ज्यांच्यावर राजा खूप प्रेम करत होता. त्या राण्यांमध्ये एक विशेष गोष्ट होती. एके दिवशी राजा आपली मोठी राणी शुभलक्ष्मी हिच्यासोबत बागेत फिरत होता. तेव्हा एक मऊ गुलाबी फूल झाडावरून टपकले आणि राणीच्या हाताला स्पर्श करून खाली पडले. राणी किंचाळली आणि बेशुद्ध झाली. राणी इतकी नाजूक होती की फुलाने तिच्या हाताला जखम झाली होती. राजाने त्वरित शहरातल्या चांगल्या वैद्यांना बोलावले.
राणीवर उपचार सुरू झाले आणि वैद्यांनी राणीला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. त्याच रात्री राजा आपल्या महालाच्या बाल्कनीमध्ये आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत आरामात बसला होता. चांदणी रात्र होती. थंड हवेचे झोत बागेतील फुलांचा सुगंध घेऊन येत होते. वातावरण खूप मादक झाले होते. तेव्हाच चंद्रावती किंचाळली, “मला ही चांदनी सहन होत नाही. ही मला जाळत आहे.” त्रस्त झालेल्या राजाने त्वरित उठून सगळे पडदे लावले, ज्यामुळे चांदणी आत येऊ शकणार नाही. वैद्य बोलावले गेले. त्यांनी पूर्ण शरीरावर चंदनाचे तेल लावले आणि आराम करण्याचा सल्ला दिला. एक दिवस राजाची इच्छा आपली तिसरी पत्नी मृणालिनीला भेटण्याची झाली. मृणालिनी तिन्हीमध्ये सर्वात सुंदर राणी होती. राजाच्या निमंत्रणावरून राजाच्या खोलीकडे जात असताना अचानक ती किंचाळून बेशुद्ध झाली. तातडीने डॉक्टर बोलावले गेले. त्यांनी पाहिले की तिचे दोन्ही हात फोडानी भरलेले आहेत. शुद्धीवर आल्यावर राणीने सांगितले की, येताना तिने स्वयंपाकघरातून येणारा तांदूळ कांडण्याचा आवाज ऐकला होता. तो आवाज असह्य होता.
बेताळाने विचारले, “राजन्, आता तुम्ही सांगा की, तिन्ही राण्यांमध्ये सर्वात संवेदनशील राणी कोण होती?” विक्रमादित्याने हळूच म्हटले, “तिसरी राणी, खरं तर तिन्ही राण्या नाजूक होत्या, पण मृणालिनी तर फक्त तांदूळ कांडण्याच्या आवाजाने जखमी झाली होती. त्यामुळे सगळ्यांमध्ये तीच सर्वात जास्त संवेदनशील होती.” “तुम्ही बरोबर आहात राजन्”, असे म्हणत बेताळ उडून परत झाडावर गेला.