शेखचिल्ली तसा तर मूर्खपणाची कामं करायचा, पण ह्या वेळेस त्याने आपल्या डोक्याचा असा वापर केला की सगळेच थक्क झाले. गोष्ट अशी आहे, की शेखला मानणारे झज्जरचे नवाब लढाईनंतर काही महिन्यांसाठी आपल्या राज्याबाहेर फिरायला गेले. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा लहान भाऊ राज्याची सूत्रे सांभाळू लागला. नवाबाच्या लहान भावाला शेख अजिबात आवडत नव्हता. त्याच्या मनात हेच असायचं की माझ्या भावाने म्हणजे नवाबाने याला उगाचच डोक्यावर चढवून ठेवलं आहे. याला कोणतंही काम व्यवस्थित करता येत नाही आणि हा कामचुकार पण खूप आहे.
आपल्या याच विचारानुसार झज्जरचा लहान नवाब शेखशी वाईट वागू लागला. एक दिवस संधी मिळताच लहान नवाबाने शेखचिल्लीला भर सभेतच झापले. ते म्हणाले, “एक चांगला काम करणारा माणूस तोच असतो, जो सांगितलेल्या कामापेक्षा जास्त काम करतो. तू तर दिलेलं कामसुद्धा व्यवस्थित करत नाहीस.” लहान नवाब पुढे म्हणाला, “तू घोड्यांना तबेलात घेऊन जाऊन त्यांना बांधतसुद्धा नाहीस. थोडं सामान उचलतोस, तर तुझे पाय थरथर कापायला लागतात. कोणतंच काम तू मनापासून का करत नाहीस? उत्तर दे.” सभेत असलेले सगळे लोक शेखचिल्लीला पडलेली झाप ऐकून खूप हसले. झाप ऐकून आणि सगळ्या लोकांना स्वतःवर हसताना पाहून शेखचिल्ली सभेतून चुपचाप निघून गेला.
काही दिवसांनंतर शेख राजमहालासमोरून जात होता. लहान नवाबाची नजर त्याच्यावर पडताच, त्यांनी त्याला लगेचच आपल्याजवळ बोलावून घेतलं. लहान नवाबाने शेखला म्हटलं, “लवकर जा आणि एखाद्या चांगल्या हकीमला घेऊन ये. आमच्या बेगमची तब्येत ठीक नाहीये.” यावर होकारार्थी मान हलवत शेखचिल्ली हकीमला शोधायला निघाला. थोड्या वेळात शेख एका हकीम आणि कबर खोदणाऱ्या मजुरांना घेऊन तिथे पोहोचला. त्याने मजुरांना महालाजवळच कबर खोदण्याच्या कामाला लावले. तेवढ्यात लहान नवाब तिथे पोहोचले आणि रागात म्हणाले की, “मी फक्त हकीमला बोलावले होते. हे कोण आहेत आणि कबर का खोदत आहेत? इथे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.”
हे ऐकताच शेखचिल्ली उत्तरादाखल म्हणाला, “जनाब! यांना कबर खोदण्यासाठी मी सांगितलं आहे, कारण तुम्हीच म्हणाला होतात की चांगलं काम करणारा माणूस सांगितलेल्या कामापेक्षा जास्त काम करतो. मी पण तुमच्या बेगमच्या आजारपणाची गोष्ट ऐकून, त्या संबंधित सगळ्या शक्यता विचारात घेऊन हे काम केलं आहे.” हे ऐकून लहान नवाब रागात महालात निघून गेले. काही दिवसांनंतर त्यांनी एक स्पर्धा ठेवली, कारण त्यांना राज्याच्या कामापेक्षा जास्त आनंद बुद्धिबळ आणि इतर खेळांमध्ये येत होता. या स्पर्धेसाठी लहान नवाबाने घोषणा केली की, जो कोणी सर्वात जास्त खोटं बोलेल, त्याला बक्षीस म्हणून सोन्याच्या हजार मोहरा दिल्या जातील.
ही घोषणा ऐकताच खोटं बोलणारी लोकं स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोहोचली. स्पर्धेदरम्यान एका खोटं बोलणाऱ्या माणसाने लहान नवाबाला सांगितलं की, “साहेब! मी म्हशीच्या आकारापेक्षा मोठ्या मुंग्या पाहिल्या आहेत. त्या पण अशा, ज्या म्हशीपेक्षा जास्त दूध देतात.” लहान नवाब म्हणाले, “हो, असं अगदी होऊ शकतं.” मग दुसरा खोटारडा म्हणाला की, “रोज रात्री मी उडून चंद्रापर्यंत जातो आणि मग सकाळी परत जमिनीवर येतो.” यावर लहान नवाब म्हणाले, “शक्य आहे, तुझ्याकडे काहीतरी जादुई शक्ती असेल, म्हणून असं होत असेल.” या दोघांच्या खोटं बोलण्यानंतर एका जाड माणसाने सांगितलं की, “मी टरबूजाच्या बिया गिळल्या होत्या. त्या दिवसापासून माझ्या पोटात टरबूज उगवत आहेत. रोज एक टरबूज पिकून फुटतो आणि माझं पोट भरतं. मला जेवण खायची पण गरज पडत नाही.”
हे ऐकताच लहान नवाब म्हणाले की, “यात काय मोठी गोष्ट आहे. तू काहीतरी चमत्कारी शक्ती असलेल्या बिया खाल्ल्या असतील.” अशा अनेक लोकांची खोटी बोलणी ऐकल्यानंतर शेखचिल्ली लहान नवाबाला म्हणाला, “साहेब! तुमची परवानगी असेल, तर मी पण या स्पर्धेत माझी काहीतरी प्रतिभा दाखवू?” लहान नवाबाने त्याची चेष्टा करत म्हटलं, “तू आणि प्रतिभा?” इतकं ऐकताच शेखचिल्ली मोठ्याने ओरडून म्हणाला की, “या पूर्ण राज्यात तुमच्यापेक्षा मोठा मूर्ख कोणी नाही. तुम्ही लगेच सिंहासन सोडून द्यायला पाहिजे, कारण यावर तुमचा कोणताही अधिकार नाही.” शेखचिल्लीचं बोलणं ऐकताच पूर्ण सभेत शांतता पसरली. मग लहान नवाब रागात म्हणाले, “या माणसाच्या धृष्टपणासाठी याला अटक करा.” त्यानंतर लहान नवाबाने शेखचिल्लीला म्हटलं की, “तू लगेच माझी माफी माग, नाहीतर मी तुझं डोकं कापून टाकेन.”
हे ऐकताच शेखचिल्ली हात जोडून बोलू लागला, “शिक्षा कशासाठी? इथे स्पर्धा चालू आहे आणि सर्वात मोठं खोटं बोलायचं आहे. मी तेच केलं आहे. कोणी माझ्या खोट्याचा सामना करू शकतं का? तुम्ही याला खोटं बोलण्यापेक्षा जास्त काही समजू नका. हे सगळं तर मी एक स्पर्धक म्हणून बोललो.” लहान नवाब विचार करू लागले की, याने आधी खोटं बोललं होतं की आता खोटं बोलत आहे, काही समजत नाहीये. काही वेळ शांत राहिल्यानंतर लहान नवाबाने शेखचिल्लीला म्हटलं की, “तू इतका मूर्ख नाहीयेस, जितका मी तुला समजत होतो. तू ही स्पर्धा जिंकलास. तुझ्यापेक्षा मोठं खोटं कोणी बोललं नाही.” आपल्या बुद्धीच्या जोरावर शेखचिल्लीने स्पर्धा जिंकून सोन्याच्या हजार मोहरा मिळवल्या. तो आपलं बक्षीस घेऊन जाताना विचार करत होता की, लहान नवाब आहेत तर मूर्खच. या सत्यामुळेच मला विजय मिळाला आणि बक्षीस पण मिळालं.
या गोष्टीमधून हे शिकायला मिळतं की, बुद्धीचा वापर केल्याने प्रत्येक अडचणीतून वाचता येतं. तसेच, कोणाचाही अपमान करू नये, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्षमता नक्कीच असते.